पणजी -कोरोना विषाणू विषयी योग्य माहिती लोकांना मिळावी यासाठी गोवा सरकारने आज 'कोबोट-19' ही सेवा सुरू केली आहे. यासाठी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअपवरु माहिती विचारल्यास त्याचा योग्य प्रतिसाद मिळेल. अशा प्रकारची सेवा देणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मिरामार-पणजी येथील आपल्या खाजगी कार्यलायात याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केली होती. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. ज्यो डिसा आणि अन्न आणि औषध प्रशासन संचालक ज्योती सरदेसाई उपस्थित होते.
कोबोट-19च्या माध्यमातून गोवा सरकार करणार कोरोना विषाणू विषयी जागृती यावेळी बोलताना राणे म्हणाले, कोबोट-19 ही अशी सेवा आहे, ज्याद्वारे नागरिकांनी '+91 79 4805 8218' हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती मिळवू शकतात. ज्यामुळे अफवा पसरण्यास आळा बसेल आणि संभ्रम दुर होईल. यासाठी पोर्टीए मेडिकल अँड वेर्लूप या कंपनीचे सहकार्य लाभले आहे. यावरील माहिती जागतिक आरोग्य संघटना, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन आणि जॉन होप्कीन या सारख्या खात्रीशीर स्रोतांकडून प्राप्त झालेली असेल.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने शाळा, महाविद्यालय या सारख्या गर्दी होणाऱ्या ठिकाणी बंदीचे निर्देश दिले आहेत. मात्र, लोकांना ती सुट्टी वाटत असून गाड्या भरून गोव्याच्या दिशेने येत आहे. तसे केले जाऊ नये यासाठी काय करता येईल यावर विचार सुरू आहे, असे सांगून राणे म्हणाले, अन्य आस्थापने बंद केली असताना सुरू असलेले मॉलही बंद करण्यावर विचार केला जात आहे. विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर थर्मल स्कँनर ठेवण्यात येतील. खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाईचे निर्देश आले आहेत.
आज सकाळी गोव्यात कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती आढळून आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्यात आली. त्यावर पोलिसांमार्फत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, गोव्यातील लोकांची काळजी घेण्यासाठी सरकार सज्ज आहे. त्याबरोबरच खाजगी इस्पितळांशी चर्चा करण्यात आली आहे. ज्यामुळे आवश्यकता भासल्यास सरकार त्याचा वापर करेल. या घडीला लोकांचे शोषण होऊ नये याठिकाणी वजन माप खातेही साठेबाजी करणाऱ्या फार्मसीवर लक्ष ठेवून आहे. गोव्यात येणारी चार्टर विमाने रद्द झाली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. ज्यावर आमचे पूर्ण लक्ष आहे.