पणजी - भाजपने दिलेली वचने पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, विरोधकांचा नेता-नीती आणि नियत अद्यापही स्पष्ट नसल्याचे गोवा भाजपचे प्रभारी अविनाश राय खन्ना यांनी म्हटले आहे. आज शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना गोवा भाजपचे प्रभारी अविनाश राय खन्ना भाजप आणि काँग्रेस यांच्या जाहिरनाम्याची तुलना केल्यास काँग्रेसचा जाहीरनामा देशाला कमकुवत करणारा आहे. काँग्रेस देशद्रोह आणि आर्म्स स्पेशल पॉवर अॅक्ट'(अस्पा) हा कायदा रद्द करू इच्छित आहे. याऊलट भाजप सरकार मागील ५ वर्षापासून देशाची सुरक्षितता मजबूत करण्याचे काम करीत असल्याचे खन्ना म्हणाले.
२०१४-१९ या काळातील भाजप सरकार आणि तत्पूर्वी केंद्रात असलेले मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना केल्यास फरक दिसून येतो. यापूर्वी दररोज कोणते ना कोणते घोटाळे होत होते. मात्र, आता दररोज नवी योजना जाहीर होताना दिसते. भाजपने जात, धर्म न पाहता 'सबका साथ सबका विकास' या न्यायाने विकासाला प्राधान्य दिले, असल्याचे ते म्हणाले.
गोव्यातील बंद झालेला खाण व्यवसाय केवळ भाजप सरकारच सुरू करू शकते. आज सकाळी उत्तर गोव्यातील एका सभेत सहभागी झालो होतो. तिथे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजप गोव्यातील दोन्ही जागा निश्चित जिंकणार असल्याचा विश्वासही खन्ना यांनी व्यक्त केला.