पणजी - चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे 'इफ्फी'ला शनिवारी पणजीत दिमाखात शुभारंभ झाला. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद पुन्हा एकदा दुमदुमला. दरम्यान, कोविड-19 महामारीमुळे उद्घाटन सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता.
गोव्यात 51 व्या इफ्फीचा शानदार शुभारंभ केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची या उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर, इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांच्यासह भारत सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रानही उपस्थित होते.
आशियातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठ्या अशा या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक सुप्रसिध्द अभिनेत्री तिस्का चोप्रा यांनी केले. चित्रपट निर्माते प्रियदर्शन नायर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. त्याशिवाय, इतर अनेक सिने कलाकारांनी देखील सोहळ्याला खास उपस्थिती लावत रसिकांचा आनंद द्विगुणीत केला.
गोव्यात 51 व्या इफ्फीचा शानदार शुभारंभ भारतात काहीही शक्य-
भारतीय पॅनोरामाच्या ज्युरीचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘भारत ही एक अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक भूमी असून इथे आपण कोणतीही स्वप्ने बघू शकतो, कारण भारतात काहीही शक्य आहे.” अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांनी व्हिडिओ संदेशातून व्यक्त केली.
बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड; भारत-बांगलादेश बंगबंधू चित्रपट करतील-
यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात, बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय, भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे, अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या.
2020 मध्ये आलेल्या कोरोना आजारावर आपण 2021 मध्ये लस निर्माण केली आहे, हे आपल्या लढाऊ वृत्तीचे द्योतक असल्याचे मत जावडेकर यांनी व्यक्त केले. भारतातील 190 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येतील
जावडेकर पुढे म्हणाले, की भारत आणि बांगलादेश यांच्या मजबूत संबंधांचे प्रतीक असलेल्या बंगबंधू या चित्रपटाची निर्मिती भारत आणि बांगलादेश मिळून करतील. शेख मुजीब उर रहमान यांच्या जीवनावर तो चित्रपट आधारित आहे. चित्रपटांच्या शूटिंगसाठी शेकडो स्थळे असलेल्या भारतामध्ये चित्रपट व्यवसाय आणखी विकसित करण्यासाठी फिल्म बजारची संकल्पना आणली गेली आहे. यामध्ये शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन व इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जात असल्याचेही जावडेकरांनी यावेळी सांगितले
इफ्फीमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग-
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात लोकप्रिय झालेल्या केबल टीव्हीचा उल्लेख करून माहिती प्रसारण मंत्री पुढे म्हणाले, की दूरदर्शनची फ्री डिश प्रेक्षकांना 104 वाहिन्यांचे मोफत प्रक्षेपण देते. इफ्फी कार्यक्रमाला केवळ भारत सरकार आणि गोवा सरकार यांच्यापुरते मर्यादित न ठेवता पुढच्या वर्षीच्या 52 व्या इफ्फी मध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग असेल, अशी घोषणा जावडेकर यांनी यावेळी केली. सिनेमाची अनुभूती भाषेच्या पलिकडची असते आणि इफ्फी ही सिनेमाची जादू अनुभवायला देणारे, केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे, असे जावडेकर यावेळी म्हणाले.
51 वा इफ्फी पहिल्यांदाच मिश्र स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात होत आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रसारणासाठी इफ्फीचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. पहिल्यांदाच हा महोत्सव ऑनलाईन होत असल्याने जगभरातील सिनेरसिक प्रतिनिधी या महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. या सुविधेमुळे यंदा नेहमीपेक्षा जास्त लोक ऑनलाईन माध्यमातून, महोत्सवात सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्याशिवाय कुठलाही सिनेउत्सव अपूर्ण असल्याचे सांगत, जावडेकर म्हणाले, की इफ्फीमध्येही त्यांना विशेष अभिवादन म्हणून रेट्रो विभागात त्यांचे अत्यंत नावाजलेले चित्रपट- ‘पथेर पांचाली’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘चारुलता’ , ‘घरे बाइरे’ आणि ‘सोनार केला’ दाखवले जाणार आहेत.
भारतीय तसेच जागतिक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी गोव्याला यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. इफ्फीमुळे जगभरातल्या चित्रपट निर्मात्यांना भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या या निसर्गसंपन्न राज्यातले सौदर्य अनुभवण्याची संधी मिळते, असे सावंत म्हणाले.
व्हिक्टोरियो स्टोरारो यांना या सोहळ्यात जीवनगौरव-
इटालियन सिनेमॅटोग्राफर, व्हिक्टोरियो स्टोरारो यांना या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र व्हिक्टोरियो स्टोरारो प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाची दखल घेतल्याबद्दल व्हिक्टोरियो स्टोरारो यांनी इफ्फीचे आभार मानले, अनेक नामवंत दिग्दर्शकांनी दिलेल्या उत्तमोत्तम संधींमुळेच आपण इथवर पोहचू शकलो, असे ते म्हणाले. तसेच “अभ्यास करा, संशोधन करा, स्वतःला तयार करा. आपल्या कामावर प्रेम करा, आपण जर कशावर प्रेम केले आणि विश्वास ठेवला तरच आपण ते ध्येय साध्य करू शकतो” असा सल्लाही त्यांनी जगभरातील सिनेमॅटोग्राफ्रर्सन दिला.
सिनेसृष्टीतील कलाकारांकडून इफ्फीसाठी शुभेच्छा-
कोविडमुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार या सोहळ्याला प्रत्यक्षात उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून ते ही या महोत्सवात आभासीरूपाने सहभागी झाले होते.“इफ्फीमधील सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा –अनुपम खेर
- “जगभरातील उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवाने 2021 ची मस्त सुरुवात होत आहे-आयुष्मान खुराना
- इफ्फी महोत्सवाकडे आम्हा सर्व सिनेप्रेमींचे विशेष लक्ष असते. हा देशातील प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवापैकी एक महोत्सव आहे –अनिल कपूर
- याशिवाय, माधुरी दीक्षित, रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, विद्या बालन, मोहनलाल अशा दिग्गज कलावंतानी व्हिडीओ संदेशातून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
चौदाव्या फिल्म बाजारचेही आभासी उद्घाटन -
यावेळी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-एनएफडीसी च्या चौदाव्या फिल्म बाजारचेही आभासी उद्घाटन करण्यात आले. एनएफडीसी फिल्म बाजार देखील यंदा मिश्र स्वरुपात, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रकारे होणार आहे. जरी हा फिल्म बाजार आभासी असला, तरीही त्यात आधीच्या इफ्फीप्रमाणेच यंदाही सर्वच विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. फिल्म बाजार ही आशियातील सर्वात मोठे चित्रपट मार्केट आहे. दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांमध्ये वित्तीय सहकार्य निर्माण करण्यास हा फिलं बाजार प्रोत्साहन देतो.
या उद्घाटन सोहळ्यानंतर दाखवल्या जाणाऱ्या ‘अनादर राउंड’ या डॅनिश चित्रपटाचे ट्रेलर यावेळी दाखवण्यात आले. डॅनिश निर्माते थॉमस विंटरबर्ग यांचा हा चित्रपट मद्याचे समर्थन करत सुरू होतो. परंतु जीवनाचे महत्त्व सांगतो. डेन्मार्क कडून या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळावलेले मॅड्स मिकेल्सन यांची या चित्रपटात विशेष भूमिका आहे.