पणजी -ऑटोमोबाईल उद्योगात आलेली मरगळ दूर करत व्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने 31 डिसेंबर पर्यंत रस्ता करात 50 टक्के कपात जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे गोवा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने स्वागत केले आहे. सरकारचा हा निर्णय परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गोवा मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यामध्ये गोव्यातील वाहन खरेदी-विक्री व्यवसायात आलेली मरगळ दूर करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत नवीन वाहन नोंदणीसाठी 50 टक्के रस्ता कर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी गोवा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने पणजीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव वल्लभ कचंकळ्येकर, परिंद नास्नोळकर उपस्थित होते.
अध्यक्ष प्रशांत जोशी म्हणाले, ऑटोमोबाईल उद्योगाला उभारी देणारा हा सरकारचा निर्णय आहे. कारण मागील काही महिन्यांत देशपातळीवर 30 ते 40 टक्के, तर गोव्यात 25 ते 30 टक्के घट झाली आहे. यासाठी वस्तू आणि सेवा कर मंडळाला ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्राने कपातीची मागणी केली होती. मात्र, ती मान्य न झाल्याने निर्माता आणि विक्रेत्यांनी एकत्रितरित्या मोठी सूट जाहीर केली होती, तरीही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आमच्या सरकारने रस्ता कर कमी करण्याची मागणी केली होती. याचा वाहतूक मंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला.