नाशिक - दुचाकीच्या नंबर प्लेटचा नंबर संशयास्पद असल्याने अंबड पाेलिसांनी चाैघांना चाैकशीसाठी बाेलविल्यानंतर एकाने घरी जाऊन विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील शिवपुरी चाैकात घडली. याप्रकरणी मृत्यूची नाेंद करण्यात आली असून नेमकी आत्महत्या प्रेमसंबंधातील विरह की मानसिक ताणतणाव केली हे तपास पूर्ण झाल्यावरच समजू शकणार आहे. अद्याप, आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
गाडी चोरीची असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी केली होती विचारपूस -
अफ्राेज हसन चौधरी (वय २०, रा. शिवपुरी चाैक, उत्तमनगर, सिडकाे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अफ्रोज आणि त्याचा मित्र हमीद खान (वय १९, रा. शिवपुरी चौक, उत्तम नगर हे (दि.१५) शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोरवाडी स्मशानभूमी रस्त्यावरून विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांना दिसून आले. पाेलिसांना ही गाडी चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांनी दाेघांकडे विचारपूस केली. त्यांनी समाधानकारक उत्तर दिली नाही, त्यामुळे अंबड पोलिसांनी त्यांना पाेलीस ठाण्यात आणून चाैकशी केली. मृत अफ्राेजवर यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. तसेच गाडीचे कागदपत्रे जवळ नसल्याने रात्री दहा वाजेच्या दरम्यान दोघांनाही त्यांच्या भावासमक्ष समज देऊन सोडून दिले. तसेच चाैघांना पुन्हा शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी दहा वाजता गाडीचे कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास कळवले हाेते. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर पडल्यानंतर अफ्राेजने रात्री एक वाजता घरात विष घेऊन आत्महत्या केली. अफ्राेजचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते त्याच्या प्रेयसीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. याच मानसिक तणावामध्ये होता. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा उलगडा होऊ शकला नाही.
हेही वाचा -धक्कादायक! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून 700 मीटर फरफटत नेले