नाशिक - 'आदिवासी भागातील पाझर स्रोत आटले, तरीही इकडे सरकारलाही पाझर फुटेना' पाणी टंचाईच्या भीषण संकटात सापडलेला आदिवासी समाज कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी दाही दिशा पायपीट करीत ( women have to walk all night to fetch a pot of water ) आहे. पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेणारा उर्वरित महाराष्ट्र जेव्हा ढेकर देऊन गादीवर पहुडण्याची तयारी करीत असतो. तेव्हा ही आदिवासी माय भगिनी काळ्या कुट्ट अंधारात काटेकुटे, झुडपे, तुडवत दगड धोंड्यांना ठेचाळत डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील सुरगाण्यातील आदिवासी पाड्यावरचे हे भीषण वास्तव आहे. धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात जिथून पाणी पाझरते, ओढ्या नाल्यामधून प्रवाहित होऊन धरणात साठते. त्या आदिवासी भागालाच पाण्याची तीव्र टंचाई भासते हे वास्तव नेहमीचेच. या पाणी टंचाईने कोरडा पडलेल्या घशातून धरण उशाशी कोरड घशाशी या शब्दांचे उच्चारण करण्याचे त्राणही या माता भगिनींमध्ये उरले नाहीत.
हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती - सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावर असलेली भीषण पाणी टंचाई पाहून हृदय पिलवटून जाते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी हातात बॅटरी घेऊन, पाण्याच्या शोधात निघालेली आदिवासी पाड्यावरची वृद्ध महिला. हे चित्र पाहून जिल्हा व्यवस्थेला कुठलीच दया येत नाही. हे पाहून मन अस्वस्थ होते. सुरगाणा तालुक्यातील मोरडा अवघ्या 600 लोकवस्तीचा पाडा मात्र पिण्यासाठी पाणीच नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकावे लागते. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम. गावातील विहिरीने तळ गाठलाय. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादा दुसरा हंडा भरतो, म्हणूनच डोंगर दऱ्याची काट्याकुट्याची वाट तुडवीत या महिलांचा अनवाणी प्रवास सुरु होतो. त्यातच हिंस्र पशूंची भीती दूर करण्यासाठी गावातील तरुण कोणी टेंभे घेऊन तर कोणी मोबाईल फ्लॅशचा उपयोग करून महिलांची पाठराखण करतांना दिसतात. या भटकंतीत एखादा झरा सापडला तर विश्व प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे समाधान या माय माऊलीच्या चेहऱ्यावर झळकताना दिसते. मग महिलांची रांग लागते.