नाशिक- जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे. पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत टाकलेले पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत करत आहेत.
पेठ तालुक्यात पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत.. - नाशिक
पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते आणि हे पाणी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. विहीरीच्या कठड्यावर चढून अक्षरशः हंडाभर पाणी मिळण्यासाठी महिला जीव मुठीत घेवून विहीरीतून पाणी काढत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. १ हजारांच्यावर गावात आणि वाड्या वस्तींवर प्रशासनच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते आणि हे पाणी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. विहीरीच्या कठड्यावर चढून अक्षरशः हंडाभर पाणी मिळण्यासाठी महिला जीव मुठीत घेवून विहीरीतून पाणी काढत आहेत. अशावेळी कुठला अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पेठ तालुक्यासारखी परिस्थिती सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, सटाणा आणि बागलाण भागात आहे. या भागात देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मनमाड शहरात तर चक्क पाण्याच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनमाड मध्ये २५ ते ३० दिवसांनंतर एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे महत्व ओळखून शहरातील नागरिकांनी सुद्धा पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. नाशिक जिल्ह्यात धरणात आज केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला जर पाऊस झाला नाही तर यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.