नाशिक - रत्नागिरितील चिपळूणमध्ये पूराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून धान्य व राॅकेल पुरवठा तातडीने सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न पुरवरठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'रस्ताच राहिला नाही, म्हणून मदत पोचण्यात अडथळे'
पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने मदतकार्य सुरु केले आहे. पुराच्या पाण्यात सर्व बुडाले असल्याने, मदत कार्यात अडथळे आले. आता पूर ओसरल्यानंतर मदतकार्य सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. असेही भुजबळ म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे इलेक्ट्रिसिटी गेली असल्याने, तातडीने रॉकेल वाटप करण्यात येत आहे. शिवभोजनच्या थाळ्या देखील वाढवून वाटप करण्यात येतील. पुराचे पाणी रस्त्यावर जास्त प्रमाणात असून तिथे मदत पोहोचायला हवी तिथे पोचत नाहीये, एनडीआरएफ काही ठिकाणी पोहोचली आहे. काही ठिकाणी अजून पाऊस पडत आहे. त्यामुळे मदतीला जास्त अडथळे निर्माण होत आहेत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.