नाशिक -गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्यचाचणी(Kaumarya Test)विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) लढा सुरू आहे. मात्र, ही प्रथा अजूनही सुरू असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. असाच एक कौमार्य चाचणीचा व्हिडिओ(Kaumarya Test Video Viral) सध्या व्हायरल होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कौमार्य चाचणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेळोवेळी जनजागृती केली आहे, परंतु, समाजात सर्वांना डावलून अनेकदा कौमार्य चाचणी केली जाते. जात पंचायतीच्या माध्यमातून या गोष्टी घडत असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'जात पंचायत मूठमाती अभियाना'ने जात पंचायतीची अशी भयानक कुप्रथा समाजासमोर आणली आहे. याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथमच कौमार्य चाचणीबाबत असा सबळ पुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ 2018 सालचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पाचशे वर्षाची परंपरा -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. समितीच्या प्रयत्नांनी पाचशे वर्षाची कुप्रथा समाजासमोर आणली आहे, परंतु त्याबाबत पुरावा मिळत नव्हता. तो पहिल्यांदाच समितीच्या हाती लागला आहे. नाशिकमध्ये रविवारी एक विवाह पार पडला होता. त्यामध्ये कौमार्य चाचणी घेणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाकडे प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या मदतीने कौमार्य चाचणी थांबवण्यात आली होती. अशी चाचणी समाजात होत नसल्याचे जात पंचायतीच्या पंचांनी पोलिसांना लिहून दिले आहे. मात्र, या दाव्याला छेद देणारा व्हिडिओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आला आहे. हा व्हिडिओ या विवाह संबंधित नसला तरी अशा प्रकारची क्रूर प्रथा चालत असल्याची ग्वाही देणारा आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत -
पुणे येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते. लग्नाच्या रात्री हॉटेलच्या एका खोलीत नववधू व वर दिसत आहेत. पांढरेशुभ्र वस्त्रावर झोपल्यानंतर त्यावर पडलेल्या रक्ताचा लाल डाग दिसत आहे. तसे वस्त्र नववधू आपल्या हाताने दाखवत आहे. हा व्हिडिओ 2018 मधला असला तरी यामुळे जात पंचायतीचा क्रूरपणा समोर आणणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी तत्त्वावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ही प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत आता पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.