नाशिक -९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असतानाच आता १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ही नाशिकला होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. २५ आणि २६ मार्चला नाशिकमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
१५ वे विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये बैठक घेऊन काही ठिकाण निश्चित करण्यात आले. अंतिम ठिकाण दोन-तीन दिवसात घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार-
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण अद्याप निश्चित नाही. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकून हे संमेलन भरवणार आहोत. तसेच कायदेशीर सल्ला घेऊन ग्रेटा थनबर्गच उदघाटनाला येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांनी सांगितले आहे.
विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी म्हणाल्या, या ब्राह्मणशाही साहित्य संमेलनाला हा विरोध नाही तर त्यांच्या तत्वाला विरोध आहे. या साहित्य संमेलनासाठी आज प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये संपन्न झाली. या बैठकीत विद्रोही साहित्य संमेलनासाठी पाच ठिकाणी निवडण्यात आले आहे. त्या-त्या ठिकाण करता संबंधित संस्थांशी संपर्क साधून चर्चा केली जाणार आहे. सर्व साधारण दोन-तीन दिवसांमध्ये एक ठिकाण निश्चित केले जाईल. त्याची घोषणा केली जाईल.