नाशिक - रामकुंडावरील गांधी तलावात असलेल्या बोटी अज्ञात इसमांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास जाळून टाकल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाज कंटक वाहनांची जाळपोळ करत आहेत. दरम्यान, नाशिकच्या रामकुंडावरील गांधी तलावामध्ये असलेल्या बोटींची काही अज्ञात समाजकंटकांनी जाळपोळ केली. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत रामवाडी पुलाजवळ गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा प्रवाह काहीसा बंद करण्यात आला. त्यामुळे गोदा पात्र कोरडेठाक पडले असल्यानं नदीच्या किनाऱ्यावर या बोटी लावण्यात आल्या होत्या.
सर्व बोटी जळून खाक झाल्यानं तीन लाखांचे नुकसान-
दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित ठेकेदाराने घटनास्थळी दाखल होऊन. आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत या बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. यामुळे या ठेकेदाराचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून आता हे नुकसान कसे भरून निघणार हा मोठा प्रश्न लक्ष्मण जाधव यांच्या समोर उभा ठाकला आहे. तर या अज्ञात समाजकंटकांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र वाहन जाळपोळी नंतर आता समाजकंटकांनी पर्यटक आणि शहराचे आकर्षण असलेल्या गांधी तलावातील बोटीच उद्ध्वस्त केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार