नाशिक- शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी वणवण फिरावे लागत आहे.अशात रेमडेसीवीर इंजेक्शन वाटपाची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून काही रुग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा पर्दाफाश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नातेवाईकांची परवड होत आहे. शहरातील मेडिकल्सच्या बाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन मिळावे यासाठी रांगेत उभे रहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी तर नातेवाईकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत सरकारचा निषेध केला होता. मात्र, पालकमंत्री भुजबळांनी आदेश दिल्यानंतर रेमडेसीवीर हे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे.
हेही वाचा-औरंगाबादमधील चौरसियांनी गच्चीवरच केली फळ भाज्यांची लागवड...
25 ते 30 कोरोनाबाधित रुग्ण असताना हजार रेमेडेसीवीरचे वितरण-
रुग्णालयांना रेमडेसीवीरचा पुरवठा करताना अन्न व औषध प्रशासनाकडून दुजाभाव करत असल्याचे खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. शहरातील काही रुग्णालयांत 25 ते 30 कोरोनाबाधित रुग्ण असताना चक्क एक हजार रेमडेसीवीर वितरित करण्यात आले आहेत. तर इतर हॉस्पिटलमध्ये 100 ते 200 रेमडेसीवीर देण्यात आल्याचे चौकशीत समोर आल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे. या प्रकारावरून भुजबळ यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. तसेच अन्न व औषधी विभागाच्या राज्य सचिवांशी चर्चा करून या इंजेक्शनचा साठा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण करण्यात अन्न व औषधी विभागाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा-'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'
7 हजार रेमडेसीवीर मिळणार-
मायलन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भुजबळ यांनी चर्चा केल्यानंतर नाशिकसाठी बुधवारी 7 हजार रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रेमडेसीवीरसाठी पायपीट करणाऱ्या नातेवाईकांची ओढाताण कमी होणार आहे.
रेमडेसीवीरचा अतिरिक्त साठा करणाऱ्यांवर कारवाई
शहरातील काही रुग्णालयांना आवश्यकतेपेक्षा अधिक रेमडेसिव्हरचा पुरवठा केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच सचिवांशी चर्चा केली असून रेमडेसीवरा चा पुरवठा नियंत्रणाबाबत आदेश दिले आहेत. अतिरिक्त साठा करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशही काढण्यात आले आहेत. पुण्यात सीरम कंपनी असतानाही आपल्याला थेट कंपनीकडूनच लस विकत घेता येत नाही. केंद्राकडून ती उपलब्ध होते. त्यामुळे खासगी वगैरे काही नाही. या काळात सर्व साठा सरकारी कोट्यात जमा होईल. तसे आदेश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.