नाशिक -रविवार पेठेतील घनकर लेनमध्ये असलेला वैश्य वाडा कोसळला. या ढिगाऱ्याखाली कोसळून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. वडील व मुलाला दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आले आहे. ही घटना शनिवार (दि. 3 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या
रविवार पेठ येथील घनकर लेनमध्ये असलेल्या वैश्य वाड्याच्या बाजूला सुरू असलेल्या बांधकामांमुळे या वाड्याची एक बाजू कमजोर झाली होती. ती बाजू शनिवारी (दि. 3 जुलै) संध्याकाळी अचानक कोसळली. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तत्काळ मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या वाड्यात अडकलेला एक पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचे राहिवाशांनी आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.