नाशिक:- मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक असल्याने, कोरोना आजारातुन बरे झालेल्या रुग्णांनी नियमित आपली शुगर लेवल तपासत रहावी, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. तर या आजाराबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून म्युकरमायकोसिस बाबत केले जाणार प्रबोधन
कोरोनावर उपचार घेत असताना रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब यांसारख्या औषधांचे डोस रुग्णांना गरजेनुसार देण्यात येतात, मात्र यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखर वाढल्यामुळे म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. यातही मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले आहे. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी नियमितपणे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण तपासत राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. तसेच या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.