नाशिक - नाशिकच्या तीन क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात समावेश झाला आहे. नाशिक शहरातील साक्षी कानडी, रसिका शिंदे व ईश्वरी सावकार या तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नाशिक जिल्ह्यातील क्रिकेट चाहत्यांनी स्वागत केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
साक्षी कानडी हिने मागील हंगामात पुदुचेरी टी-20 स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे 23 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे 19 वर्षाखालील महिलांसाठी 50 षटकांच्या एक दिवसीय सामन्याची स्पर्धा होते, त्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने तीन खेळाडूंची निवड झाली आहे, स्पर्धेपूर्वी पुणे येथील गोवा महिला संघासोबत सराव सामने खेळविण्यात येत आहेत. महाराष्ट्र संघाचा समावेश एलटीडी गटात असून या महिला संघाचे एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धचे साखळी सामने 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान सूरत येथे खेळवले जाणार आहे.