महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट.. नाशिक जिल्ह्यात 400 टन ऑक्सिजनची व्यवस्था - नाशिक कोरोना अपडेट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून,ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी शहर आणि ग्रामीण भागात मिळून 400 टन ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे.

oxygen plant
oxygen plant

By

Published : Jul 21, 2021, 9:13 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने हॉस्पिटलमध्ये बेड, औषधासोबत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अशात अनेक रुग्णांचे हाल होऊन अनेकांना जीवाला मुकावे लागले होते. अक्षरशः ऑक्सिजनसाठी रुग्णांना वणवण करावी लागत होती. या दरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 45 हजाराच्या वर जाऊन पोहचली होती. जिल्ह्यात दररोज 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असताना केवळ 85 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत होता. आरोग्य यंत्रणा देखील हतबल झाल्याचे चित्र होते. अशात रेल्वेने ऑक्सिजन आयात करावा लागला होता. या सर्व गोष्टी लक्षात घेता आता प्रशासनाने खबरदारी घेत शहर व जिल्हा मिळून 400 टन ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे.

लहान मुलांना अधिक धोका -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेत 1 लाख 25 हजार मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते, असा अंदाज काढण्यात आला आहे. त्यापैकी 5 हजार मुले रुग्णालयात दाखल होतील, असा तर्क लावण्यात आला असून यासाठी सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये 5 हजार बेडची तयारी ठेवण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी दिवसाला 400 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल अशी व्यवस्था महानगरपालिका हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण उपरुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत.

..अशी आहे ऑक्सिजनची व्यवस्था -

106 मेट्रिक टन ग्रामीण भागासाठी तर 240 ऑक्सिजन शहरी भागासाठी असेल तसेच 62 पीएसए प्लांटच्या माध्यमातून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या सोबत 40 जम्बो सिलिंडरची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लसींची कमतरता -


कोरोनाच्या तिसऱ्या लाटे आधी लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा कल असला तरी, लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही. नाशिक जिल्ह्यात दिवसाला मोजक्याच लस उपलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचे चित्र आहे. अशात लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून सरकारने जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details