नाशिक -द्वारका येथील ट्रॅक्टर हाऊसजवळील झाडाझुडपात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या मृतदेहासंदर्भात पोलिसांच्या तपासात असे उघडकीस आले की, मृतक आपल्या साथीदारांसह स्टार लाईन बिल्डींगमध्ये सळई, गज गेला होता. यावेळी तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रिक्षा न मिळाल्याने साथीदारांनी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या चोराचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मृतासह त्याच्या साथीदारांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडला चोर -
मुंबई-आग्रा रोडवरील महिंद्रा ट्रॅक्टर हाऊस समोरील सबवेमधील झाडाझुडपांमध्ये एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर, गुन्हे विभागाचे निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. मृतदेहाची ओळख पटवत असतांना मृताचा मित्र शितळादेवी मंदिर परिसरात असल्याची माहिती समजल्यावर पाेलिसांनी त्याचा शोध घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याने मृताचे नाव चंदू सामा रहासे उर्फ भोला (३२, मुळ रा. मांडवी खुर्द, नंदुरबार) असे सांगितले. चंदू व त्याचे साथीदार दि. २० सप्टेंबर राेजी पहाटे पाच वाजता ट्रॅक्टर हाऊसजवळील स्टार लाईन बिल्डींगमध्ये सळई, गज चोरी करण्यासाठी गेले हाेते. तेव्हा बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून चंदू खाली पडला.