नाशिक- नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी येथील इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनाच येथे साफ-सफाई करण्यासाठी सांगितले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिकच्या रुग्णालयातील दृश्य नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा 30 हजार पार गेला असला तरी 24 हजार हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जात आहे. हे सर्व जण आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची टक्केवारी 81 टक्के इतकी झाली आहे. मात्र, असे असले तरी दुसरीकडे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणेची प्रतिमा मालिन होत आहे.
नाशिकचे शासकीय रुग्णालय समस्यांचे आगार बनत चालले का, असा प्रश्न सूज्ञ नाकरिकांकडून उपस्थित होत आहे. नाशिकच्या पंचवटी येथील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी बजरंगवाडी भागातील एका महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, या कालावधी रुग्णांच्या नातेवाईकांनाच येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात सफाई करण्यासाठी सांगण्यात आले. अशात रुग्णांच्या काळजीपोटी नातेवाईक देखील हातात झाडू घेऊन रुग्णालयाची रोज साफसफाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.
याबाबत मन्सुरी या महिलेने आवाज उठवत रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी रोज नातेवाईकांना झाडू मारण्यास भाग पाडत असल्याचे म्हटले आहे. याबाबत हे कुटुंब आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागात सफाईसाठी कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा पगार दिला जातो. मात्र, त्या सफाई कर्मचाऱ्यांची कामचुकारपणा करत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका नेमकी काय कारवाई करणार, याकडे नाशिककरांचे लक्ष आहे.
जिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीची लिफ्ट मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रुग्णांना नेण्यासाठी अक्षरशः नातेवाईकांना झोळी करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिफ्ट बंद असल्याने ती लवकरात लवकर दुरुस्त करावी, याबाबत जिल्हा रुग्णालयाने बांधकाम विभागाला कळवले आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून याची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने याचा त्रास नाहक रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे.
हेही वाचा -सततच्या पावसाने मूग पिकाचे नुकसान, शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली जनावरे