नाशिक- नाशिक राेडच्या नवीन बिटको रुग्णालयात तोडफोडप्रकरणी गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे नाशिक रोड पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ताजणे हा सोमवारी संध्याकाळच्या सुमारास स्वतःहून नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल होत पोलिसांना शरण आला होता. ताजणे हा नाशिक महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका सीमा ताजणेंचा पती आहे.
थेट बिटको हॉस्पिटलमध्ये आपली गाडी घुसवत केली होती तोडफोड...
नाशिकरोड बिटको हॉस्पिटलमध्ये कोराेना उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही,म्हणून दिनांक 15 मे रोजी कन्नू ताजणे याने नवीन बिटको हॉस्पिटलच्या काचेच्या प्रवेशद्वारातून ईनोव्हा कार थेट आतमध्ये घुसवून नुकसान केले होते. त्यानंतर ताजणे फरार होता. अटक होऊ नये म्हणून ताजणे याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला हाेता. दरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु ताे, सापडला नाही. नाशिक रोड पोलिसांनी ताजणेच्या अनेक मित्रांना नोटीस देऊन चौकशी केली होती. मात्र तरीही ताे सापडला नाही. अखेर ताजणे सोमवारी सायंकाळी स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
रुग्णांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचा आरोप, मेन गेटची तोडफोड
भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने नाशिक रोड येथील महानगरपालिका संचलित बिटको रुग्णालयाच्या मुख्य दरवाजातून थेट इनोव्हा कार रुग्णालयात घुसवली होती. यामुळे रुग्णालयाचे गेट उद्ध्वस्त करत साहित्याची तोडफोड करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा न झाल्याने ते संतापले होते. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे रुग्णालयाची तोडफोड केली, अशी चर्चा त्यावेळी होती.