नाशिक - देशभरात सुरू असलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये सर्वपक्षीय संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली काढत व्यापारी आणि दुकानदारांना या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शालिमार चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असताना पोलिसांनी आंदोलकर्त्यांना रोखल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.
बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना रोखले
पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांसमोर पोलीस तोकडे पडल्याने अखेर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना केले. मात्र यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना शहरात रॅली काढल्याने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
विविध पक्ष सहभागी
नाशिकच्या शालिमार चौकातून काढण्यात आलेल्या या सर्वपक्षीय रॅलीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी,छावा क्रांतीवीर संघटना, बहुजन समाज पार्टी, शेतकरी कामगार पक्ष अशा सर्वच पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. माकपाचे नेते डॉक्टर डी. एल. कराड, काँग्रेसचे नेते शरद आहेर, शोभा बच्छाव, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पगार, करण गायकर, राजू देसले शोभा बच्छाव, राजाभाऊ बागुल आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढत निदर्शने करण्यात आली. शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू करण्यात आलेली रॅली शिवाजी रोड, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.