नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील गंगाद्वार येथे डोंगराच्या कड्यावरील दगड व माती गंगा गोदावरी मंदिरासमोरील पटांगणात कोसळली. कोरोनामुळे भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याची मागणी होत आहे.
अद्याप कुठलाही निर्णय नाही
या भागात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. उन्हाळ्यात ब्रह्मागिरी पर्वतावरील दगड मोठ्या प्रमाणात तापतात. यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर या पाण्यामुळे या दगडांना तडे पडतात, त्यामुळे दगड व माती मोकळी होऊन अनेक वेळा येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. हा भाग वन खात्याच्या अखत्यारीत येत असून धोकादायक दगडांना संरक्षक जाळी लावावी, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केले आहे, मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना धोका कायम आहे. या कोसळलेल्या दगडांमुळे गोमुख गोदावरी मंदिराचे व इतर मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्रंबकेश्वर क्षेत्रात ब्रह्मगिरी व गंगाद्वार हे गोदावरीची उत्पत्ती म्हणून प्रसिद्ध आहे.