नाशिक -नाशिक परिक्षेत्रातील धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ भागातून गांजाची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे त्यापैकी काही ठिकाणी वनविभागाच्या जमिनीवरच गांज्याची शेती सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पाेलिसांनी केलेल्या कारवाईत ४ कोटी रुपयांचा गांज्या, ब्राऊन शुगर, चरस असा एनडीपीएस गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट करण्यात आली आहे, तर युवकांना बेकायदेशीरपणे हत्यार विकणार्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली आहे.
ब्राऊन शुगरचा ५०० ग्रॅम साठा हस्तगत -
नाशिक परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर यांनी शनिवारी नाशकात पत्रकार परिषद घेऊन मागील दाेन महिन्यांत केलेल्या धडाकेबाज कारवाईची माहिती दिली. यावेळी नाशिकचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे एसपी प्रवीण मुंढे, अहमदनगरचे एसपी मनोज पाटील व धुळ्याचे एसपी प्रविणकुमार पाटील यांच्यासह नंदूरबारच एसपी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
चार कोटींचा गांजा, ब्राऊन शुगर, चरसचा साठा जप्त गेल्या दीड ते दाेन महिन्यात उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविताना पथकाने चरस, गांजा आणि ब्राऊन शुगरचा साठा हस्तगत केला. ब्राउन शुगरचा ५०० ग्रॅम साठा हस्तगत करण्यात यश आले असून आंतरराज्य मार्गावरील अंमली पदार्थाच्या तस्करी सोबतच उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गांज्याची शेती सुरू असल्याचे उघड झाले. केवळ खासगी जागेवर नव्हे तर काही भागात थेट वनविभागाच्या सरकारी जमिनीवर गांज्याची शेती सुरु असल्याने सिद्ध झाले असून तरुणांना बेकायदेशीरपणे शस्त्रास्रे विकणार्या मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. हत्यार विक्री करणारा मुख्य सराईत सतनामसिंग याला अटक करण्यात आली आहे.
तब्बल ४ कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त -
या कारवाईत ५,१६५ किलो गांजा, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४८१ ग्रॅम चरस आणि वाहने असा तब्बल ४ कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, नाशिक या पाच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात केलेल्या कारवाईत ५१६५ किलो गांजा, ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४८१ ग्रॅम चरस आणि वाहने असा तब्बल ४ कोटी ६० लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २२ गुन्हे दाखल करुन ३९ संशयितांना अटक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये चोरून गांजाची शेती केली जात होती.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी रमजानपूरा भागात ४८१ ग्रॅम चरस वाहनासह जप्त -
२४ सप्टेंबर रोजी शेखर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिक परिक्षेत्रात अंमली पदार्थ, अवैध शस्त्र, गुटखा विक्री, अवैध मद्य अशा अवैध धंद्यांना पायबंद घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली त्यात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष पथकांनी धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर तर चाळीसगाव रस्त्यावर ६२ किलो गांजा जप्त केला. नाशिक ग्रामीण पोलिसांनी रमजानपूरा भागात ४८१ ग्रॅम चरस वाहनासह जप्त केला. जळगावच्या मुक्ताईनगर येथे व नंदुरबारमधील उपनगर येथील कारवाईत ५ जणांकडून ३३ लाख २४ हजारहून अधिक किंमतीचा गुटखा आणि वाहने जप्त करण्यात आली. धान्याचा काळाबाजार रोखण्यावर लक्ष दिले जात असून पथकांनी १३ लाख रुपये किंमतीचा दोन मालमोटारींसह रेशनिंगचा तांदूळ व गहू जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. मालेगावच्या पवारवाडी येथून ४३ लाखाचे बायो डिझेल, शिरपूर येथे नऊ लाखाच्या टेम्पोसह अवैध दारू, ८६ लाख रुपये किंमतीचे स्पिरीट, अवैध डांबर चोरी प्रकरणी ६३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष पथकांनी १६ ठिकाणी छापे टाकून ६३ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन दोन कोटी ६८ लाखहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याचे शेखर यांनी सांगितले. अवैध गुटखा प्रकरणी ३७ गुन्हे दाखल करीत ६४ संशयितांकडून सव्वा दोन कोटीहून अधिकचा पानमसाला व वाहने जप्त करण्यात आली आहेत.
हे ही वाचा -भाजप नेत्याने आदिवासी महिलेला डांबून ठेवले होते, मंत्री नवाब मलिक यांचा नवा आरोप
दोन महिन्यात वेगवेगळ्या कारवाईत एकूण ४० गावठी कट्टे, ८४ काडतुसे तसेच ६५ तलवारी जप्त -
उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कारवाईत एकूण ४० गावठी कट्टे, ८४ काडतुसे तसेच ६५ तलवारी जप्त करण्यात आल्या. तरुणाई अवैध पिस्तुल व कट्टे बाळगून गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष पथकांनी अलीकडेच वाडीवऱ्हे, चोपडा शहर व ग्रामीण भागात केलेल्या कारवाईत सात संशयितांकडून आठ गावठी कट्टे, २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासात गावठी कट्ट्याचे धागेदोरे थेट उत्तरप्रदेश व बिहारसह मध्यप्रदेशात पोहोचले असून तेथून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. एकूण ६२ जणांविरुध्द ६० गुन्हे दाखल करण्यात आले. यात ६५ तलवारीसोबत आठ लोखंडी कोयते, नऊ सुरे, प्रत्येकी एक सत्तूर, गुप्ती, चॉपर जप्त करण्यात आले आहे.