नाशिक - राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक व नागपूरच्या मेट्रोसाठी राज्य सरकार आपला वाटा उचलणार असून, त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे जो आर्थिक भार देईल त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल व राज्य सरकार वाट्याचा पूर्ण भार उचलेले, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने दोन पावले मागे यावं
शेतकरी त्यांच्या हक्कासाठी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. कोर्टाने सरकारला चर्चा करण्यास सांगितले मात्र 14 वेळा चर्चा होऊनही त्याबाबत निर्णय होत नाही. त्या चर्चा निष्फळ ठरतात. सरकारने दोन पावले मागे घेऊन त्यातून मार्ग काढावा. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून भावूक झाले पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या ठिकाणी भरती करणार
मेगा भरतीबाबत बोलताना पवार म्हणाले की, सरकार ज्या ठिकाणी अतिशय जास्त गरज आहे तेथे भरती करत आहे. पोलीस,आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या महत्त्वाच्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवत आहे. इतर ठिकाणी खर्चाचे नियोजन करून भरती करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.