नाशिक - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातच स्टॅम्प पेपरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 100 च्या स्टॅम्प पेपरची 500 रुपयांना अवैध विक्री होत असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. लॉकडाऊन काळात स्टॅम्प पेपर विक्री बंद असल्याने जिल्हाधिकारी कार्यलयातील कर्मचारीच हा काळाबाजार करत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देऊन, तथ्य आढळल्यास आजच गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुरज मांढरे - जिल्हाधिकारी, नाशिक हेही वाचा -चंद्राच्या तब्बल 55 हजार फोटोंतून साकारला एकच अद्भुत फोटो; पाहा गॅलरी..
100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची 500 रुपयांना केली जातेय विक्री
स्टॅम्प पेपर चढ्या दरात विकणाऱ्या वेंडर्सवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. तर यामध्ये शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आढळून आल्यास त्यांची देखील गय केली जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा नुकताच उघडकीस आला होता. अशातच आता नाशिक शहरात देखील 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर 500 रुपयांना इतक्या चढ्या दरात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या अनेक स्टॅम्पवेंडरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्टॅम्प पेपर्सची चढ्या दरात विक्री होत असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र, असे काही प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लॉकडाऊनचा फायदा घेत स्टॅम्प पेपर्सचा काळाबाजार
यामध्ये शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांची देखील गय केली जाणार नाही, असा सूचना वजा इशारा देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे स्टॅम्प पेपर्सची चढ्या दरात विक्री करणाऱ्यांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले आहेत. एकीकडे नाशिक शहरात कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच दुसरीकडे लॉकडाऊनचा फायदा घेत काही जणांकडून स्टॅम्प पेपर्सचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा -आशा-गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने १५ जूनला लाक्षणिक संपाचा इशारा