नाशिक - एसटीचा संप (ST Strike) चिघळतच चालला असून पेठ तालुक्यात एका एसटी कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. गहिनीनाथ गायकवाड असे मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पेठ आगारात कार्यरत हते.
तब्बल ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्या
कमी पगार, एसटीचे खासगीकरण आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येते आहे. दरम्यान, आजवर तब्बल ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या एसटीच्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते. गायकवाड हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.
महिनाभरापासून आंदोलनातही सहभागी
अनेक चालक कर्जबाजारी झाले असून त्यांना मिळणारा पगार तुटपुंजा आहे. पेठ पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आधीच कमी पगार, त्यातही तो वेळेत होईल, याची शाश्वती नसताना आता एसटीच्या वेगवेगळ्या संघटनांकडून संप सुरू आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, म्हणून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, अनेक चालक कर्जबाजारी झाले असून त्यांना मिळणारा पगार तुटपुंजा आहे. त्यातून घर चालविणे व मुलाबाळांचे शिक्षण करणे कठीण झाले आहे. त्यातून अनेक कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत.