दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाला सुरुवात झाली होती. अगदी ७ जूनपर्यंत परिसरात समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पिकाच्या पेरणी आणि भात लागवडीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे बळीराजा आभाळाकडे नजर लावून बसला आहे.
दिंडोरी तालुक्यात पहिल्या पावसात सुमारे २०७२ हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, काही भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन, मका, उडीद, मूग पेरणीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता यानंतर ६ ते ७० मीलीमिटर जमीनीत ओलावा आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी केले आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणीला ब्रेक हेही वाचा...मालेगावातील जवानाला गलवान खोऱ्यात वीरमरण
दिंडोरी तालुक्याच्या पाश्चिम भागात भात, नागली, वरई आदी पिके पावसावर अवलंबून असतात. यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे साधारण तालुक्यातील ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनी मका, भुईमुग, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र, मागील दहा-बारा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे सर्वच पिकांची वाताहत झाली आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिके उगवण्यापुरता जमिनीत ओलावा तयार केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मिळाले नव्हते. त्यावेळी दिंडोरी तालुक्यातील कृषी विभागामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावातील सोयाबीनची माहिती संकलित करून त्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासून आपआपल्या गावाच्या आणि परिसरातील नागरिकांना कृषी सेवकांपर्यत बियाण्यांची माहिती देऊन स्थानिक शेतकऱ्यांकडील बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करून दिले होते. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पाहता तालुक्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांनी खतांची मागणी केली. त्यांना कृषी सेवा केंद्रामार्फत बांधावर खते उपलब्ध करून दिली.
यावर्षी चांगल्या पावसाला सुरुवात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाल्यामुळे आम्ही सोयाबीन आणि भुईमुग पिकाची पेरणी केली. परंतु, मागील दहा-बारा दिवसापासून वातावरण उष्ण झाल्यामुळे सोयाबीनचे पीक करपू लागले होते. ज्या सोयाबीन पिकाला उगवण्यासाठी पाण्याची कमतरता भासली त्या पिकांना विहीरीचे पाणी देत असल्याचे सोयाबीन उत्पादक लक्ष्मण चौधरी यांनी सांगितले.