नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात रंगपंचमीला एक अनोखी प्रथा जोपासली जात आहे. या गावात जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढून अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. तब्बल दीडशे वर्षांची ही परंपरा आजही गावात जोपासली जात असून मोठ्या थाटामाटात ही मिरवणूक काढली जाते.
नाशिकच्या वडांगळी गावात रंगपंचमीनिमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक हेही वाचा...ऐकावे ते नवलच.. 'या' गावात काढली जाते जावयाची गाढवावरून मिरवणूक; 80 वर्षांपासूनची परंपरा
गावातील ईडापीडा जावो, याकरता ग्रामीण भागात शेतकरी नेहमीच विनवणी करत असतात. मात्र, वडांगळी गावात ईडा पीडा जावो आणि गावातील नागरिकांना सदृढ आणि चांगले आरोग्य लाभो, यासाठी रंगपंचमीच्या दिवशी गावातील जावयाची गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. शुक्रवारी ही अनोखी प्रथा रंगपंचमीनिमित्त वडांगळी गावात पार पडली.
प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावातील जावयाचा मान असतो. मात्र, काही जावई या परंपरेचा मान स्वीकारण्यासाठी साहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडत असते. मात्र, परंपरा टिकवण्यासाठी गावातील नागरिक जावयाला विनवणी करत गावी आणतात आणि परंपरेचा मानकरी बनवतात.
हेही वाचा...कोरोनामुळे 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट टळली, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन
कशी पार पडते मिरवणूक...
गावातील वेशीवर रंगाने भरलेल्या टाक्या ठेवल्या जातात आणि सुरू होतो, तो अनोख्या रंगपंचमीचा खेळ. जावयाला गाढवावर बसवल्यानंतर त्याच्या गळ्यात तुटक्या चपलांची माळ, कांद्याची माळ घातली जाते. डोक्याला सूप बांधल जातं आणि अंगावर रंग ओतून तोंडाला वेगवेगळे रंग फासून त्याला गाढवावर बसवले जाते. यावेळी डिजेच्या तालावर ठेका धरत गावातील तरुण जावयाला चांगलेच नाचवतात. दाजी-दाजी करत सर्वच जण दाजींची टिंगल उडवतात. गावात मिरवल्यानंतर एका घरी जावयाला गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यानंतर नवीन कपडे, नवीन चप्पल देऊन गोडधोड खाऊ घालतात आणि स्वागत करतात.
मागील दीडशे वर्षांच्या या परंपरेमुळे गावातील रोगराई निघून जाते. आतापर्यंत या परंपरेमुळे गावावर कोणतही संकट आलेले नाही, असा दावा गावकरी करत आहेत. विशेष म्हणजे जावयाला प्रत्येक ठिकाणी मानपान देत स्वागत केले जाते. परंतु वडांगळी गावात जावयाची गाढवावर बसून मिरवणूक काढून स्वागत केले जात आहे, त्यामुळे हे गाव चर्चेत आले आहे.