नाशिक - सर्व महिन्यातील श्रावण महिना हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यात श्रावणातील सोमवारी केलेली पूजा, व्रत अधिक लाभदायक असता असे भाविकांची धारणा आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवाला जवची शिवमूठ वाहावी त्याने फलप्राप्ती होते असे धर्मात सांगितले आहे.
महिला करतात ही पूजा :श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. यात पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवची, तर पाचव्या सोमवारी सातूची शिवमूठ शिवाला वाहतात. यावेळी नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।', असा मंत्र शिवामूठ वाहताना म्हणावा. ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नसेल, त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.