नाशिक : शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख व नगरसेविका सत्यभामा गाडेकर(वय 56) यांचं कोरोनाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने उत्तर महाराष्ट्रातील महिला आघाडीत पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. सत्यभामा गाडेकर यांची नाशिक जिल्ह्यातील आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख होती. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी सुरवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता. ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिला.
शिवसेनेची वाघीण गेली - अरविंद सावंत
नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन - नाशिक
सत्यभामा गाडेकर यांची नाशिक जिल्ह्यातील आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख होती. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी सुरवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता. ग्रामीण भागात शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा हातभार राहिला.
![नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन नाशिक : शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11702483-454-11702483-1620611920571.jpg)
शिवसेनेची वाघीण गेली अशा शब्दांत शिवसेनान नेते अरविंद सावंत यांनी गाडेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. 'दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत निष्ठा आणि आदर असणाऱ्या शिवसेनेची वाघीण नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाल्याची क्लेशदायक बातमी समजली आणि अंतःकरण हेलावून गेले. मी नाशिकचा संपर्क प्रमुख असताना त्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक म्हणून कार्य करत होत्या. दबदबा होता त्यांचा. पुढे नगरसेविकाही झाल्या. शिवसेनेच्या असंख्य आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. मला एक प्रसंग आठवतो, मला वाटते निवडणुकीचा कालावधी होता, काही गुंड गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे सत्यभामा ताईच्या नजरेस येताच वीज पडावी त्या वेगाने त्यांनी झडप घातली आणि असा काही प्रसाद दिला की ते तेथून पसार झाले. धाडस त्यांच्या रोमारोमात भिनला होता. अलीकडे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्या उत्तम काम करत होत्या. महापालिकेत त्यांच्या कामाचा ठसा उमटला होता. आणि अचानक ही दुःखद बातमी आली. हा कोरोना अजून किती हतबल करणार आहे. आपल्या हातात फक्त नतमस्तक होणे आणि हात जोडून श्रद्धांजली वाहणे एव्हढेच उरले आहे. शिवसेनेची वाघीण गेली याचे मनस्वी दुःख आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना..!' अशी श्रद्धांजली शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे.
लढवय्या नेतृत्व हरपलं - छगन भुजबळ
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लढवय्या नेतृत्व हरपलं अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'नाशिक शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे दुःखद निधन झाले. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका असलेल्या सत्यभामा गाडेकर यांनी शिवसेना पक्षामध्ये विविध महत्वाची पदे भूषविली. त्या अतिशय लढवय्या नेत्या होत्या. नागरिकांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमकपणे भूमिका घेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर असलेलं एक लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने गाडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय गाडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.' अशा शब्दांत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गाडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.