नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकला दाखल होताच त्यांनी पुलोद सरकारमध्ये सहकारी असलेले माजी मंत्री स्वर्गीय विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. आजच्या या दौऱ्यात पवार आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजच्या हॉलमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
शिल्लक कांद्याचे करायचे काय?
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर निर्बंध लावल्याने नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. या निर्णयामुळे मोठ्या व्यापाऱ्यांना 25 टन आणि लहान व्यापाऱ्यांना 2 टन कांदा साठवणुकीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी व्यापाऱ्यांकडे 25 टन पेक्षा अधिक कांदा असून त्या कांद्याचे करायचे काय? असा प्रश्न सरकारला विचारत व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवल्या आहेत.
शेतकरी आणि व्यापारी केंद्राच्या निर्बंधाबाबत मांडणार गाऱ्हाणे-
आज नाशिक जिल्ह्यात केवळ 10 ते 15 टक्के उन्हाळी कांदा शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून किरकोळ बाजारात 90 ते 100 रुपये किलो कांदा विकला जात आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नवीन लाल कांदा येण्यास उशीर झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, केंद्र सरकार साठवणूकीसंदर्भात निर्बंध आणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केला. कांदा साठवणुकीवर लावण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकरी व्यापारी आज शरद पवार यांच्याकडे करणार आहेत. तसेच कांदा उत्पादक शेतकरी देखील आपल्या अडीअडचणी पवार यांच्या समोर मांडणार आहेत.
ऊसतोड कामगार प्रश्नानंतर कांदा प्रश्न सोडवणार पवार-
शरद पवार यांनी मंगळवारीच ऊसतोडणी कामगारांच्या वाहतूक दराचा प्रश्न चर्चेतून निकाली काढला आहे. यावेळी धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे दोघेही ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नावर एकत्र आले होते. आता आज शरद पवार कांदा उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. आता शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चर्चा करून कांदा प्रश्न सोडवणार का हे पाहावे लागेल.