नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार बघता नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक स्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाशिकमध्ये 31 मार्चपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
नाशिक शहरात 31 मार्चपर्यंत कलम 144 लागू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - corona maharashtra
कोरोना नियंत्रणासाठी सार्वजनिक व खाजगी आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी सामाजिक अंतरासंदर्भात निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
कोरोना नियंत्रणासाठी निर्बंध
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशात जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेसह पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. कोरोना नियंत्रणासाठी सार्वजनिक व खाजगी आस्थापनांचे प्रमुख यांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी सामाजिक अंतरासंदर्भात निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यात दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर असावे, कन्टेन्मेन्टसंदर्भातील शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश उपरोक्त कालावधीत सर्व संबंधितांना बंधनकारक राहणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवासादरम्यान नागरिकांनी मास्क वापरणं बंधनकारक असून उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी करण्यात आली आहे.
नियम मोडल्यास कारवाई
नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात राजकीय सामाजिक कार्यक्रम, मेळावे, यात्रा, उरुस, क्रीडा स्पर्धा, आठवडी बाजार व मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्ती यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या अधीन राहून एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2)अन्वये कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.