नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने 3 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या शाळा, महाविद्यालये 4 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 4 जानेवारीपासून सुरू होणार नाशिक जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. प्रशासनाने लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. दिवाळीत बाजारपेठ खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. जिल्हा प्रशासनाने 3 जानेवारीपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिवाळी होऊन महिनाभर उलटल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसल्याने नाशिक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
मात्र सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून पहिली ते आठवीपर्यंत शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या कोरोना चाचणी करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्हे वगळून अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय सुरू झाले असून त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून,राज्यात नाशिक जिल्ह्याचा मृत्यू दर देखील कमी आहे. त्यामुळे येत्या 4 जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र शहरातील सुरू करण्याचा किंवा ग्रामीण भागातील सुरू करण्याबाबत मुंबई, पुण्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा महानगरपालिका आयुक्त घेणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा निश्चितपणे सुरू होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच शहरात देखील तोच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.