नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दुकानांवर काही निर्बंध आणले आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दुकाने पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. या बंदमधून सलून व्यवसायाला सूट द्यावी, अशी मागणी नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही वाचा -शेतकऱ्याने मुलाप्रमाणे केले बैलावर प्रेम, वाजत गाजत काढली अंत्ययात्रा
नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज कोरोनाचे एक हजाराच्या वर नवीन रुग्णांची भर पडत असून 6 हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानांबाबत निर्बंध कडक केले असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकानांना सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रविवार हा दिवस सलून व्यवसायासाठी महत्वाचा असल्याने अनेकजण सुट्टीचा दिवस बघून सलून दुकानात येत असल्याने रविवारच्या दिवशी सलून व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी नाभिक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.