नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी, राज्य सरकारच्या निर्देशानुसार दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक रेल्वे स्थानकात प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोवा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिकच्या रेल्वे स्थानकात प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच ज्या प्रवाशांना कोरोनाची लक्षणे आढळून येतील, त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांच्या बॅगादेखील सॅनिटाइझ करण्यात येत आहेत. महापालिका व रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.