नाशिक -महाराष्ट्रात महसुली दंडाधिकाऱ्यांचे जमीनविषयक अधिकार 'महसूली जिल्हे' ही संकल्पना बंद करुन त्याऐवजी भुमाफियागिरी वाढल्याने नाशिकसह 7 जिल्ह्यात आयुक्तालये संकल्पना राबविली जावी अशी मागणी करीत पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी एक लेटर बॉब टाकला. (Commissioner of Police In Nashik) पोलीस महासंचालकांसह राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पाठविलेल्या या पत्राने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
महसूल अधिकारी आरडीएक्स -जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना हाताशी धरून जागामालकांचा छळ करीत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्ससारखे आहेत. तर, कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार डिटोनेटरसारखे आहेत. आरडीएक्स व डिटोनेटर मिळून जिवंत बॉम्ब बनतो, जो भूमाफिया त्यांच्या मर्जीप्रमाणे वापरत असल्याचा खळबळजनक आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी केला आहे.
महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप -नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शहरीकरण, औद्योगिकरण, आधुनिकीकरणासाठी महसूल अधिकार्यांकडील कार्यकारी दंडाधिकार्यांचे अधिकार काढून घेण्याची मागणी पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. त्या पत्रात पोलीस आयुक्तांनी महसूल विभागावर गंभीर आरोप केले आहेत.