नाशिक -जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना शेट्टी यांनी, शेतकरी कांद्याला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवतो आणि जेव्हा भाव असेल तेव्हा विक्री करतो, मात्र सरकार नेहमी काळ्या मांजरासारखे आडवे येऊन शेतकऱ्यांच्या मुळावर उठते. यातूनच कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करणे आणि बाजारात अस्थिरता निर्माण करणे, अशी कामे केली जातात. यापुढे असा अन्याय अजिबात सहन करणार नाही, असे शेट्टी यावेळी म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी पाहणी केली हेही वाचा...' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'
खासदार राजू शेट्टी यांनी नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका करत, राज्यात पोरखेळ सुरू असल्याचे सांगितले. प्राप्तिकर विभाग आज कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकत आहे, इतक्या दिवस काय झोपा काढल्या का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नाही, म्हणून हा सर्व खेळ सुरू असून बाजारभावात अस्थिरता निर्माण करून शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसेही मिळू द्यायचे नाहीत, असे शेतकरी विरोधात असलेले सरकार जायलाच हवे, असेही यावेळी ते म्हणाले.
हेही वाचा... दिल्लीची हवा 'अतिगंभीर' श्रेणीतच, श्वास घेणे बनलेय कठीण
आमचा पक्ष संयुक्त महाआघाडी सोबत आहे, पण निवडणुकीनंतर काही फेरजोड्या होणार असतील तर त्याबाबत अद्यापही आमच्याकडे विचारणा केलेली नाही. या बद्दल काही भाष्य करणे योग्य नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सद्यातरी आम्ही महाआघाडीसोबत आहोत, असेही राजू शेट्टी म्हणाले.