नाशिक -अडीच महिन्यापूर्वी बिटको काेविड हॉस्पिटल तोडफोड करणारे राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे अखेर सोमवारी नाशिकरोड पोलिसांना शरण आले. याप्रकरणात गेल्या अडीच महिन्यापासून ते फरार होते.
नाशिक पोलिसांना स्वतःहून शरण -
नवीन बिटको काेविड रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा न झाल्याने संतापलेल्या भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांनी रुग्णालयात गाडी घुसवून तोडफोड केली होती. याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. अखेर सोमवारी ते नाशिक पोलिसांना स्वतःहून शरण आले आहेत.
बिटको रुग्णालयात थेट गाडी घुसवत केली होती तोडफोड -
नाशिक राेडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये कोराेना उपचारासाठी योग्य सुविधा मिळत नाही म्हणून भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती कन्नू उर्फ राजेंद्र ताजणे यांनी 15 मे 2021 राेजी नवीन बिटको रुग्णालयाच्या काचेच्या प्रवेशद्वारावर इनोव्हा गाडी घालून नुकसान केले होते. घटनेनंतर ताजणे हे पसार झाले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी नाशिकराेड पोलिसांनी इनोव्हा कार जप्त केली होती. परंतु ताजणे हे पसारच होते.
हायकोर्टाने जामीन फेटाळला -
अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ताजणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला होता. नाशिक रोड पोलिसांनी राजेंद्र ताजणे यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत. लाेकेशन बदलत असल्याने पाेलिसांना ठावठिकाणा सापडत नव्हता. अखेर कन्नू ताजने हे काल (सोमवारी) सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यात स्वतःहून शरण आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय शेळके करत आहेत.
हेही वाचा - योग्य उपचार मिळत नसल्याने बिटको रुग्णालयात तोडफोड; सीमा ताजणे यांचे स्पष्टीकरण