नाशिक- केंद्र सरकारने खासगी कोचिंग क्लासेसला सूक्ष्म उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने खासगी क्लासेसला उद्योगाचा दर्जा द्यावा, ही प्रमुख मागणी करत 50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा असहकार आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा कोचिंग क्लास टीचर्स असोसिएशन अँण्ड सोशल फोरम आँफ महाराष्ट्रच संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. बंडोपंत भुयार यांनी दिला.
हेही वाचा -नाशिक : सराफ दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक
50 टक्के क्षमतेने क्लासेस सुरू करण्याची मागणी
संदीप फाउंडेशन येथे रविवारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भुयार बोलत होते. मागील सरकारमध्ये विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना क्लासेसला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी समिती गठित केली व अहवाल तयार केला. मात्र, नवीन सरकार आले व तो अहवाल धुळखात पडला आहे. राज्य सरकारने खासगी क्लास चालकांना उद्योगाचा दर्जा देऊन राजमान्यता द्यावी, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. शासनाने महसुलाच्या दृष्टिकोनातून मद्य विक्री, माॅल यांना परवानगी दिली. मात्र, शैक्षणिक क्षेत्राकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून अनास्था पहायला मिळत असल्याचे भुयार म्हणाले.