नाशिक -कोरोनामुळे देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद असल्याने अनेक व्यायामप्रेमी सायकलिंगकडे वळले आहेत,अशात मागील चार महिन्यात सायकल विक्रीत तिपटीने वाढ झाली असून सायकल दुकानात विदेशी सायकलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने मागील 6 महिन्यांपासून जिल्ह्यातील व्यायाम शाळा आणि जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्यबाबत जागरूक असलेले अनेक नागरिक सायकलिंगला पसंती देत आहेत. मागील चार महिन्यात 35 ते 40 हजार सायकलींची विक्री झाली असून ग्राहक गिअरच्या विदेशी सायकलला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. भल्या पहाटे युवक-युवतींसह वृद्ध व्यक्ती मुंबई-आग्रा महामार्ग, गंगापूर रोड, त्र्यंबकेश्वर रोड, देवळाली रोड, पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणत सायकलिंग करताना दिसून येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच व्यायामासाठी अनेकांनी सायकलची निवड केली आहे. मात्र अशात मोठ्या सायकलींची विक्री वाढली असली तरी शाळा बंद असल्याने लहान सायकल विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
ईटीव्ही भारत विशेष : ग्राहकांची विदेशी सायकला पसंती, विक्रीत तिपटीने वाढ - नागरिकांची सायकलिंगला पसंती
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत जागरुक नागरिकांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये अनेक जणांनी सायकलिंगला प्राधान्य दिले आहे. यामुळे सायकलींच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विदेशी सायकल खरेदीसाठी तर दोन महिन्यापर्यंत वेटींग लागले आहे.
विदेशी सायकलला दोन महिन्यांचे वेटिंग -
जगातील समृद्ध देशांमध्ये सायकल वापरण्यास प्राधान्य दिले जाते. यामध्ये जपान, नेदरलँड, डेन्मार्क आदी देशांत नागरिक दैनंदिन जीवनात सायकलींचा मोठया प्रमाणात वापर करतात. त्यामुळे सध्या नाशिक शहरातील नागरिकसुद्धा याचे अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. उच्च मध्यमवर्गीय यापूर्वी भल्या पहाटे मॉर्निंग वॉकला प्राधान्य देत होते. मात्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबरोबरच व्यायामशाळा आणि जलतरण तलाव बंद असल्याने अनेकांनी व्यायामासाठी सायकलची निवड केली. 35 ते 55 वयोगटातील प्राध्यापक, शिक्षक, राजकारणी, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तीही गिअरच्या सायकल वापरून शारीरिक फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सायकल चालवणे आरोग्य साठी हितकारक -
वैद्यकीय सल्ल्यानुसार सायकल चालवण्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यात रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते, मेंदूची शक्ती वाढते, हृदय निरोगी राहते, स्नायूंना मजबुती येते, वजन कमी होते आणि याचे महत्व कोरोना काळात सर्वांना पटू लागले असल्याने अनेक जण सायकलिंग करण्याला पसंती देत आहेत.