नाशिक -जेलरोडच्या मंदिरातील दागिने चाेरून शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या जोशी दाम्पत्याला नाशिकरोड पाेलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रवासी रिक्षासह २ लाख २४ हजाराचा सोन्या-चांदीच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे.
४८ रिक्षाचालकांची चौकशी -
चोरी, घरफाेडी करणारे बंटी-बबली रिक्षात फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना कळाली हाेती. त्यांनी पाेलिसांना सांगून साध्या गणवेशात सापळा रचला हाेता. परंतु ते हाती आले नाही. मात्र, जाेशींची रिक्षा त्र्यंबकेश्वरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने त्रंबकेश्वर गाठून विविध ठिकाणी जाऊन ४८ रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यानंतर संशयित रिक्षाचालकाचे नाव मनोज जोशी व पत्नी लक्ष्मी जोशी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तीन दिवस त्र्यंबकेश्वर शहरात संशयित जोशी यांचा शोध घेतला. दरम्यान, तो त्रंबकेश्वर टेलिफोन एक्सचेंज जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दोघांचाही फोटो पाेलिसांकडे आल्यावर पोलिसांनी दोघांनाही नाशकात रिक्षासह ताब्यात घेतले.