नाशिक -मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. आता पोलीस आणि ध्वनी प्रदूषण मंडळ एकत्रितपणे सर्वच धार्मिक ठिकाणी लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा तपासणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
होऊ शकतो तुरुंगवास :धार्मिक प्रथा परंपरा, रितीरिवाज आणि कायदा सुव्यवस्था यांचा विचार करत भोंगे लावण्याच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंगवास किंवा थेट हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी प्रतिबंध न करता 3 मे पर्यंत पोलीस आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना मशिदीपासून 100 मीटर दूर अंतरावर तेही नमाजाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर पंधरा मिनिटाचे बंधन असणार आहे. तसेच भोंगे लावून नमाज म्हणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण विषयक नियम पाळावे लागणार आहे.