नाशिक - सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात असलेल्या विशाल पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्याने जवळपास पाच लाखांची रोकड लांबवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या अज्ञात चोरट्यावर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : सिडको परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा... घटना सीसीटीव्हीत कैद - nashik robbery news
सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात असलेल्या विशाल पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्याने जवळपास पाच लाखांची रोकड लांबवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस तपास सुरू आहे.
नाशिकमध्ये सध्या चोरी-घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात विविध ठिकाणी दररोज घरफोडी आणि चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने अशीच धाडसी चोरी केल्याचा प्रकार सिडको परिसरातील दत्त मंदिर चौकात घडला. याठिकाणच्या विशाल पेट्रोल पंपावर मध्यरात्री एकाने दरोडा टाकून पाच लाख रुपये लांबवल्याचे समोर आले आहे.
याबाबत विश्वास घोरपडे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र याबाबत पोलिसांना माहिती विचारल्यानंतर त्यावर बोलण्यास नकार दिला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. मात्र नवीन नाशिक भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून बळावत असलेली गुन्हेगारी रोखण्यास पोलीस कठोर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.