नाशिक- कोरोनाचे संकट आल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र नाशिकच्या काही पालकांनी ऑनलाईन शिक्षणाला फाटा देत होम स्कुलींगचा पर्याय निवडत घरातच मुलांना शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे.
ऑनलाईन शिक्षणाला फाटा; पालकांनी सुरू केला नाशिकचा 'होम स्कुलींग' पॅटर्न नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत सरकार देखील ठोस निर्णय घेऊ शकत नाही. अशात आता अनेक बहुतांश शाळांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा पर्याय सर्वच पालकांना पसंत न पडल्याने नाशिकमधील काही पालकांनी छोट्या गटातील मुलांना शिक्षण देण्यासाठी होम स्कुलींग सुरू केली आहे. यासाठी आईच मुलांसाठी शिक्षिकेची भूमिका पार पडताना दिसत आहे.
असे दिले जाते घरातच शिक्षण
घराच्या एका खोलीत शाळेतील वर्गासारखे वातावरण तयार करुन मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. प्रत्येक पालकांसाठी मुले हा जिव्हाळाचा विषय असल्याने काही दिवसानंतर सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम घालून शाळा सुरू देखील करण्याचा निर्णय घेतला, तरी मुलांना लगेच शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत पालक दिसत नाहीत. शाळेत लहान मुलं डिस्टन्सिंगचे किती पालन करतील अशी शंका देखील पालकांना आहे. त्यामुळे लहान मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ न देता घरातच शाळा सुरू केली आहे.
आई असते मुलांचा पहिला गुरू
मुलं आईच्या गर्भात असल्यापासूनच खऱ्या आर्थने आई मुलांना घडवत असते. त्यामुळे आई ही मुलांची पहिली गुरू असते असे म्हणता येईल. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत असल्याने आमच्या मनात भीती आहे. तर दुसरीकडे शाळेंनी सुरू केलेली ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत आम्ही समाधानी नाही. यात लहान मुलं किती एकाग्र होऊन एका जागेवर बसतील यात आम्हाला शंका आहे. तसेच ऑनलाईनबाबत दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे तासंतास मोबाइल आणि लॅपटॉप समोर बसल्यामुळे त्यांच्या डोळ्यांचे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्ही यावर्षी तरी मुलाला शाळेत पाठवणार नाही. त्याला घरातच शिक्षणाचे धडे देणार आहोत. यासाठी मुलाला घरात शाळेतील वातावरण मिळवे असा प्रयत्न आम्ही करत आहोत.