नाशिक : ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा सापडलेला नव्या प्रकारचा विषाणू 70 टक्के अधिक घातक असल्याने, सगळीकडेच खबरदारी बाळगली जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या महिन्याभरात ह्या देशातून नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या 121 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. महिन्याभरात इंग्लंड आणि युके मधून नाशिक शहरात 90 तर नाशिकच्या ग्रामीण भागात 21 प्रवासी आले आहे.
महिनाभरात इंग्लंडहून नाशिकमध्ये आलेल्या प्रवाशांची होणार आरटीपीसीआर चाचणी प्रवाशांना शोधण्याचे काम सुरू..
या प्रवाशांचा शोध घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यामुळे, आता नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. जे प्रवासी आतापर्यंत सापडले आहेत, त्यांची आरटीपीसीआर चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. चाचणी निगेटिव्ह आल्या नंतरसुद्धा दक्षता म्हणून त्यांना 7 ते 14 दिवस घरीच क्वारंटाईन केले जाणार आहे.
परतलेला एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही..
जेव्हा प्रवाशी इंग्लंड, यूके,ब्रिटन मधून भारतातील विमानतळावर येतात तेव्हा त्यांचे कोरोना अहवाल त्यांच्या सोबत असतात.तसेचं विमानतळावर त्यांचे स्कानिग केले जाते त्यानंतरचं त्यांना बाहेर सोडले जाते. यातील आतापर्यंत नाशिकला आलेला एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आला नाही. जर एखादा प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्याला आम्ही तात्काळ आयसोलेट करणार आहोत. तसेच त्याचे रिपोर्ट पुणे येथे एनआयव्हीला पाठवणार असून त्याचा स्ट्रेन ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनशी जुळतो का हे तपासले जाणार आहे. त्यानंतर आलेल्या अहवालानुसार या रुग्णावर पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती मनपा नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी दिली आहे.
हेही वाचा :औरंगाबादमध्ये ब्रिटनहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह, तर १३ जणांचा लागेना पत्ता