नाशिक - शहरातील खासगी शाळांमध्ये बेसुमार शालेय शुल्कात वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीय पालकांचा शासकीय महानगरपालिका ( Government Municipal School ) आणि जिल्हा परिषदेच्या ( ZP Schools ) शाळेकडे कल वाढला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना आता नवीन वर्षात मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे. त्यात शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील ( English medium schools Nashik ) फीचा आकडा 50 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांवर जाऊन पोहचल्याने सर्वसामान्य पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असल्याने मध्यमवर्गीय पालकांचा कल जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका ( Nashik Municipal Corporation ) शाळांकडे वाढू लागला आहे.
आजच्या नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 ची सुरुवात झालेली नसतानाही काही खासगी शाळांकडून पहिलीच्या वर्गातील नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले जात आहे. त्यामुळे आरटीई लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसमोर मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळवून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे काही पालक शासकीय शाळेचे पर्याय निवडत आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 अद्याप संपलेली नाही. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने केले आहेत. असे असतानाही शहरातील खाजगी शाळांच्या प्रवेशद्वारावर प्रवेश पूर्ण झाल्याचे फलक दिसू लागले. या शाळांकडून पूर्व प्राथमिक वर्गातच शाळेतील प्रवेश पूर्ण झालेले असल्याचे कारण दिले जात आहे. ज्या शाळा पहिलीच्या वर्गात प्रवेश देत आहेत त्यांच्याकडून बेसुमार शुल्काची आकारणी होत आहे.