नाशिक - मुंबई आणि ठाण्यासाठी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत महत्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस येत्या 12 सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. यासाठी प्रवाशांना आरक्षण करणे बंधनकारक असणार आहे. आरक्षण नसलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना या ट्रेनमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. आता ही ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी आरक्षण केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.
'पंचवटी एक्सप्रेस' पुन्हा रुळावर... मुंबई-ठाणे-नाशिक प्रवासासाठी बुकींग सुरू - mumbai to nashik railway
मुंबई-ठाणे-नाशिक मार्गावर धवणारी पंचवटी एक्सप्रेस पुन्हा रुळावर येणार आहे. यासाठी आवश्यक बुकींग सुरू झाले आहे.
!['पंचवटी एक्सप्रेस' पुन्हा रुळावर... मुंबई-ठाणे-नाशिक प्रवासासाठी बुकींग सुरू nashik to mumbai rainways](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8759766-975-8759766-1599804274789.jpg)
कोरोनामुळे पहिल्या टप्प्यापासून देशभरातील रेल्वे सेा संपूर्ण बंद करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील शंभर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात मुंबई-ठाण्याला जाण्यासाठी नाशिककरांसाठी पंचवटी एक्सप्रेस येत्या शनिवारपासून धावणार असल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र प्रवासासाठी केवळ आरक्षित प्रवाशांना स्थानकाच्या आवारात प्रवेश देऊन प्रवासाची परवानगी देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
कोणतेही आरक्षण नसलेले किंवा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार नाही. यामुळे आपले तिकीट आरक्षित करण्यासाठी अनेकांनी नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पास काढून नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्या पंचवटीच्या पास धारकांची निराशा झाली आहे. यामुळे शासनाने पास धारकांसाठी नियम आणि अटी घालून देत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पासधारक प्रवासी करत आहेत.
दरम्यान, रेल्वेसेवा पुन्हा सुरू होणार असली, तरी प्रवाशांना दीड तास अगोदर रेल्वेस्थानक परिसरात हजर राहावे लागणार आहे. ही रेल्वे पूर्णपणे राखीव ठेवण्यात येणार असून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. तसेच कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना प्रवास करता येणार आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाश्यांना फेस मास्क लावणे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.