नाशिक -महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे..लोकसभा निवडणुकीनतंर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असल्याने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार मिळणं देखील कठीण झालं आहे.
हेही वाचा... पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार
नाशिक जिल्हा
जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून,2014 मधील विधानासभा मतदारसंघ पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 2, भाजप 4, शिवसेना 4, माकप 1 अशी परिस्थिती आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी युतीच्या उमेदवारांना पसंती दिल्याने नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असेच चित्र विधानसभेतही दिसेल असं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. नाशिक जिल्ह्यात प्रमुख लढत येवला मतदारसंघात होईल असं दिसतंय, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला...छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होत होत्या, मात्र भुजबळांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहत, शिवसेनेत जाणार का ? या प्रश्नाला पूर्णविराम दिला. अस म्हटलं जातंय की, भुजबळांना शिवसेनेतुनच मोठ्या प्रमाणात विरोध झाला. भुजबळांनी सेनेत प्रवेश केल्यास आपलं अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने नाशिकच्या काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून भुजबळांना सेनेत येण्यासाठी विरोध केला. तसेच येवला मतदार राष्ट्रवादीकडून भुजबळांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांना पक्षातीलच काही नेत्यांनी येवला मतदारसंघातून तिकीट मिळावे म्हणून पक्षाकडे उमेदवारी मगितली आहे.
त्यामुळे भुजबळांना पक्षातूनच काही प्रमाणात विरोध होत असल्याचे चित्र आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर युतीला मिळालेलं यश बघता भाजप शिवसेनेमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून 18 जणांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती इतर मतदारसंघांची देखील आहे. तर, दुसरीकडे मनसेने विधानसभा निवडणुकीसंदर्भात कुठलीच भूमिका स्पष्ट नं केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.
हेही वाचा.. विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर
जळगाव जिल्हा
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी, 6 मतदारसंघ भाजप, 3 मतदारसंघात शिवसेनेचे, तसेच उरलेल्या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष आमदार आहे.
या ठिकणी भाजप-सेनेची युती तुटली तर भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते असं चित्र आहे. लोकसभेतील युती कायम राहिली तरीही भाजपचेच पारडे सेनेच्या तुलनेत जड राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखे वजनदार नेतेमंडळी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला आपसूकच होईल. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल, अशीच सध्या चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या २००९ च्या फॉर्म्युल्यानुसार ११ पैकी 6 मतदारसंघ भाजपकडे तर पाच मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा आमदार झाला होता. त्यामुळे जागा वाटप करताना भाजप विद्यमान आमदारांचा मतदारसंघ सेनेला सोडणार नसल्याचे सध्या तरी हे चित्र स्पष्ट आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून सध्या तरी बाद झाले आहेत. यामुळे तिथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग तूर्ततरी मोकळा दिसतो आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप देखील या मतदारसंघात आपली ताकद लावून गुलाबराव पाटलांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे जळगाव शहर मतदारसंघातून इच्छुक असलेले सेनेचे माजी मंत्री सुरेश जैन आणि चोपडा मतदारसंघातून सेनेकडून दावेदार असलेले विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना देखील घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्याने ते रिंगणातून बाद झाले आहेत. त्यामुळे सेनेची डोकेदुखी वाढली आहे. युती तुटली तर जळगाव जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ ठरणार असं चित्र आहे...
हेही वाचा... राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा स्वबळाचा नारा; राज्यात 25 जागेवर उमेदवार देणार
अहमदनगर जिल्हा