नाशिक -कोविड-19 च्या काळात आरोग्य शास्त्रांतील विद्यार्थ्यांचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ऑनलाईन विसाव्या दीक्षान्त समारंभाप्रसंगी केले. ते या समारंभास ऑनलाईन उपस्थित होते. या समारंभास कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो-
या दीक्षांत समारंभातील अध्यक्षीय भाषणात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन आरोग्य विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम केले. याबद्दल मला अभिमान आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे. कोविड-19 च्या परिस्थितीत आरोग्य विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या परीक्षा यशीस्वीरित्या घेतल्या याबद्दल विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन नाशिक हे तीर्थक्षेत्रासमवेत आरोग्य विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र बनवून त्याचा जागतिक ठसा उमटवावा असेही त्यांनी सांगितले.
आयुर्वेद आणि योग शास्त्र मानवी आरोग्यासाठी व उपचारासाठी महत्वपूर्ण -
ते पुढे म्हणाले की, आयुर्वेद आणि योग शास्त्र मानवी आरोग्यासाठी व उपचारासाठी महत्वपूर्ण आहे. यासाठी या शास्त्रांतील संशोधनात अधिक महत्वपूर्ण कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाज व परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात करावा जेणेकरुन पेपरलेस कामकाज करता येईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल, असे त्यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करतांना सांगितले की, कोविड -19 विषाणू आजारासंदर्भात जनजागृतीकरिता विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने व्हीडीओ द्वारे जनजागृती, मास्क वाटप, आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी जनजागृती करणे, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप व इतर उपक्रम राबविले. अवयदान करण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून घेण्यात आले. यामध्ये निबंधस्पर्धा व पोस्टर पेंटींग करणे आदी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.