नाशिक -नाशिक शहरातील 607 रुग्णालयांपैकी 318 हॉस्पिटलने फायर ऑडिट ( Nashik Hospital Fire Audit ) केलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणारे हॉस्पिटल आता महानगरपालिकेच्या रडारवर आले असून अशा हॉस्पिटलला अग्निशामक विभागाने ( NMC Notice To Hospitals ) नोटीस बजावत पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य -महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम नुसार शासकीय कार्यालय, हॉटेल, बियर बार अँड रेस्टॉरंट, रुग्णालय, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यावसायिक इमारती, मंगल कार्यालय औद्योगिक इमारती, गोदामे, सिनेमागृह, पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवाशी इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑडिटचे ब प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकार्याकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.