महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून 'नो हेल्मेट,नो पेट्रोल'.. पेट्रोल पंपावर राहणार पोलीस बंदोबस्त - नो हेल्मेट,नो पेट्रोल

नाशिक शहरात दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे आता पोलीस आयुक्तांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश देत 15 ऑगस्टपासून नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम सुरू करणार आहेत.

'No helmet, no petrol
'No helmet, no petrol

By

Published : Aug 4, 2021, 2:11 AM IST

नाशिक - नाशिक शहरात दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे आता पोलीस दलाकडून 15 ऑगस्टपासून नो हेल्मेट नो पेट्रोल ही मोहीम सुरू केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना याबाबत आदेश दिले आहेत. यासाठी सर्व पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 21 जुलै 2016 आणि 5 ऑगस्ट 2016 अन्वये नो हेल्मेट न पेट्रोलचे धोरण निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागाने याची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच गृहविभागानेही 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सार्वजनिक सुरक्षा हितासाठी मोटर वाहन चालवण्यावर वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश देते हेल्मेट परिधान केलेल्या चालकांना पेट्रोल द्यावे, हेल्मेट नसेल तर इंधन देऊ नये असे धोरण शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसाठी लागू करत अधिसूचना काढली आहे. विना हेल्मेट चालकांना पेट्रोल दिल्यास अशा दुचाकीस्वाराचा नमुना फॉर्म प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त व पालकमंत्री
पेट्रोल पंपावर राहणार पोलीस बंदोबस्त -नो हेल्मेट नो पेट्रोल आदेशाची अंमलबजावणी करताना सुरुवातीचे पंधरा दिवस पोलिसांकडून शहरातील पेट्रोल पंपावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंपावर वाद झाल्यास संबंधित चालकावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश आहेत. या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग किमान 45 दिवस पंपचालकांना जतन करावी लागणार आहे.हेल्मेटचा वापर जीव वाचवण्यासाठी -

रस्ते अपघातात मृत्यू टाळण्यासाठी दुचाकी चालकांना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. या मोहिमेत आम्ही कुठल्याही प्रकारचा दंड वसूल करणार नसून लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्ती करत आहोत. याबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत, त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी नाशिककरांना केले आहे.

विना हेल्मेट दुचाकीस्वारांचे मृत्यू वाढले -

नाशिक शहर वाहतूक विभागाच्या अहवालानुसार 2017 ते जून 2021 या पाच वर्षात 782 अपघातांमध्ये 825 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 467 दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे. यातील 394 चालकांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे अहवालात समोर आले आहे.


कृपया सर्वांनी हेल्मेट वापरावे - भुजबळ

नो हेल्मेट, नो पेट्रोल याबाबत माझ्या पर्यंत काही पेट्रोल पंप चालक आले होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की दुचाकी चालकांना हेल्मेट वापरा असं कुठल्या कायद्याने सांगू शकतो आणि आमच्यावर का निर्बंध लावतात, मात्र असं असलं तरी कृपया सर्वांनी हेल्मेट वापरले पाहिले, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

शहरात हेल्मेटची गरज नाही -

हेल्मेट सक्ती शहरात नको, शहरात दुचाकी चालवताना वाहनांचा स्पीड मर्यादित असतो. आधीच कोरोना काळात नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी आधी सिग्नल यंत्रणा, शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करावी. पोलिसांनी नवीन नियम आणून नागरिकांना त्रास देऊ नये, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details